मुंबई : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं होतं. निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करून देखील केजरीवालांनी ही निवडणूक स्थानिक प्रश्न केंद्रित ठेवत दिल्ली विधानसभा राखली हे त्याहूनही विशेष.
आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास दुणावला असून आपचे दिल्ली मॉडेल इतर राज्यांत राबवण्यासाठी वरिष्ठपातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता दिल्ली विजयानंतर आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी नव्या जोमाने कामला लागले असून केजरीवालांच्या विकासाचा पॅटर्न महाराष्ट्रातील घरोघरी पोहचवण्यासाठी ‘पॉलिटिक्स ऑफ वर्क’ या कार्यक्रमास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये “‘पॉलिटिक्स ऑफ वर्क’ कार्यक्रमाद्वारे दिल्लीतील केजरीवाल सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या कार्यपद्धतीत असलेला फरक अधोरेखित करण्यात येणार असून दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही आप केवळ लोकहिताच्या मुद्द्यांवरून राजकारण करेल” अशी ग्वाही देण्यात आली आहे. हा कार्यक्रम २३ मार्चपर्यंत चालेल.
“दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या विजयानंतर देशभरातील अनेक राज्य केजरीवाल विकास मॉडेलचा अवलंब करताना दिसत असून दिल्लीतील सरकारी शाळा व मोहल्ला दवाखाने नागरिकांसाठी भाग्यदायी ठरत आहेत.” असा दावा आप’च्या पत्रकात करण्यात आला आहे.
दिल्लीतील विजयानंतर आम आदमी पक्ष टप्प्याटप्प्याने देशभरामध्ये कार्यकर्ता बेस वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय.