#लोकसभा2019 : आपचे दिल्लीत स्थानिकांना प्राधान्य

नवी दिल्ली – आगामी काळात दिल्लीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 85 टक्के आरक्षण देण्यात येईल, असे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचेही स्पष्ट केले.

दिल्लीत सध्या नोकरी आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्याबाहेरून आलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीतून शिक्षण घेणाऱ्य़ांना नोकऱ्य़ांमध्ये 85 टक्‍के आरक्षण देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

भारताने आजपर्यंत अनेक हल्ले सहन केले. मात्र, आता भारताच्या एकतेवरच प्रहार केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही एकट्या दुकट्या पक्षाची राहिलेली नाही. मोदी-शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत युती का होऊ शकली नाही, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. युतीची चर्चा ही ट्‌विटरवर होऊ शकते का? असा प्रश्न करत मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले तर त्यासाठी केवळ राहुल गांधीच जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी केजरीवाल यांनी दिला.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेस-आप युतीसंबंधीचे वक्तव्य ट्‌विटरवर केले होते. कॉंग्रेस दिल्लीतील चार लोकसभा मतदारसंघ आपसाठी सोडायला तयार आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. आपसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, पण वेळ हातातून निसटत चालला आहे, हे ध्यानात राहू द्या, असे राहुल यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस-आप युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)