नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आम आदमी पक्षाकडून निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे.
पत्रकार परिषदेत, आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, निवडणुकी पूर्वीही केजरीवाल यांच्यावर दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीतच हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. भाजपचे दोन बालेकिल्ले असलेल्या गुजरात आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने भाजप खासदार मनोज तिवारी आणि इतर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.
कालच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मनोज तिवारी यांनी दिलेल्या धमकीच्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजप नेते मनोज तिवारी यांनी गुरुवारी वापरलेली भाषा ही खुली धमकी असल्याचा दावाही सिसोदिया यांनी केला.
दरम्यान, गुजरात निवडणुक ही दोन टप्प्यात होणार आहे. 1 आणि 5 डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.