पुणे – ‘मराठा आरक्षणाच्या विषयावरून रविवारी शहरात पुन्हा “एक मराठा, लाख मराठा’चा आवाज घुमला. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती तत्काळ हटवून हा प्रश्न सोडवावा, यांसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले.
यावेळी टिळक रोडवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस, जंगली महाराज रस्त्यावरील भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस भवन आणि डेक्कन येथील शिवसेना भवन या कार्यालयांच्या ठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पक्षाच्या प्रमुखांना मागणीचे निवेदन दिले.
“एक मराठा लाख मराठा’, “मराठा आरक्षण वाचवा’, “मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या’, “सारथीची मुस्कटदाबी बंद करा’, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत, मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी भगवे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनाची सुरवात हिराबाग येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालय येथून सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार व शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टी याठिकाणी खासदार गिरीश बापट आणि आमदार भिमराव तापकीर, कॉंग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि आमदार संजय जगताप, तर शिवसेना भवन कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी आंदोलनाला सामोरे जात “आम्ही मराठा समाजसोबत उभे आहोत,’ असे आश्वासन दिले.
“मराठा क्रांती मोर्चाकडून अनेक आंदोलने झाली, अनेकांना निवेदन दिले. आता यापुढे पक्ष आणि मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करणार हे सांगावे,’ असे मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. “आंदोलनात सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगतात, आकडेवारी जाहीर करतात. मात्र प्रत्यक्षात कायमस्वरूपी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर नोकरभरती करणार नाही, असे सांगण्यात आले. तर आता मराठा समाजाचे आरक्षण बाजूला ठेवून भरती करणार असे म्हणतात. 58 मोर्चे झाले, 42 जणांनी बलिदान केले अजून कशाची वाट पाहता,’ असा प्रश्न आंदोलकांकडून विचारण्यात आला.