Aaditya Thackeray on Nagpur Violence | मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कबर हटवण्याच्या मुद्यावरून नागपूरात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘भाजपला महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करायचे आहे’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा अशा प्रकारची घटना एखाद्या शहरात घडते आणि हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे, तेव्हा अफवा पसरू लागल्या तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया का आली नाही? हे मला जाणून घ्यायचे आहे, ते मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत.
जेव्हा जेव्हा अशी घटना घडणार असते तेव्हा पहिला अहवाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, भाजपला महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवायचे आहे, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार पाहायला मिळत आहे. तिथे गुंतवणूक होईल का? पर्यटन वाढेल का? नाही. भाजपला महाराष्ट्रावरही तीच परिस्थितीत आणायची आहे., असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, नागपूरमध्ये हिंसाचारानंतर कलम 163 लागू करण्यात आले आहे. तसेच, पोलिसांकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ही घटना पूर्वनियोजित कट असून जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही. राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.