पुणे – प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) ही निवृत्ती वेतन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. यासाठी आधार क्रमांक बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण सरकारतर्फे करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, ही योजना भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून राबविली जात आहे. ही योजना 2017-18 व 2018-19 च्या अर्थसंकल्पात विषद करण्यात आली होती. त्यानुसार वार्षिक 8 टक्के दराने परतावा मिळणे अपेक्षित आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांक द्यावा लागेल किंवा आधार सारखी ओळख पटवावी लागेल.
या परिपत्रकानुसार ज्या ज्येष्ठांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडे आधार क्रमांक नसेल तर, त्यांनी आधार क्रमांकासाठी नोंदणी करण्याची गरज आहे. हा आधार क्रमांक मिळाल्यानंतर या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. ज्येष्ठांची बायोमेट्रिक माहिती अनेएकदा निर्माण केली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत अंमलबजावणी संस्था अशा नागरिकांना आधार क्रमांक देण्याबाबत मदत करतील. अशा कागदोपत्री आधार क्रमांकावर क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्यू आर कोड उपलब्ध केला जाईल. मार्च 2020 पर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येऊ शकणार आहे.