आधार कार्डमुळे गतिमंदांना मिळालेत पालक

धुळे : आधार कार्डमुळे दुसऱ्या राज्यातील असलेल्या तीन निरागस गतिमंद मुलांना त्यांच्या आईवडिलांची माया पुन्हा मिळाली आहे. आधारकार्डमुळे वेगवेगळ्या राज्यातील हरवलेल्या तीन गतिमंद मुलांना तब्बल चार ते पाच वर्षांनंतर आपले आई-वडील मिळाले आहेत.

उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहार राज्यातून हरवलेल्या तीन मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात बालकल्याण समिती तसेच शिरपूरच्या बालगृहाला तब्बल चार ते पाच वर्षानंतर यश आले आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोनू शर्मा (बरना, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा), दीपक (रा. लिधौरा एवनी, जि. झाशी, उत्तरप्रदेश) , मोहम्मद गुड (रा. बाकरपूर, जि. मुंगेर, बिहार) अशी या मुलांची नावे आहेत. त्यापैकी मोनू हा पाच वर्षांपासून हरवला होता. चुकून रेल्वेने प्रवास करत तो हरियाणातून मुंबईला पोहोचला होता. दीपक मागच्या आठवड्यातच उत्तरप्रदेशातून घरातून पळून रेल्वेने भुसावळला पोहोचला.

पोलिसांना सापडल्यानंतर त्यांना पुनर्वसनासाठी गतिमंद बालगृहात दाखल करण्यात आले. तिथे प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून तिघांचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न झाला.

त्यावेळी या तिघा मुलांचे आधार कार्ड यापूर्वीच काढल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा आधार डेटा मिळविण्यासाठी त्यांना मुंबई येथे आधार कार्डच्या प्रादेशिक कार्यालयात नेले असता त्यांचे आधार कार्ड हाती आले. आधार कार्डमुळे त्यांचे नाव, पत्ता देखील मिळाला. त्यानुसार बालकल्याण समिती आणि बालगृहाने मुलांच्या पालकांना संपर्क साधून त्यांची मुलं सुखरुप असल्याची माहिती दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.