विडणी – मुंबई-गोवा महामार्गावर पुण्याहून गोव्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स कणकवली येथे पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात विडणी, (ता. फलटण) येथील आण्णा नाळे नावाचा युवक जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गुरुवार, दि.19 रोजी मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून गोव्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स कणकवलीजवळ हळवल फाटा येथील वळणावर आली असता चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली.
या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून यामध्ये विडणी (दहाबिघे) (ता. फलटण) येथील आण्णा गोविंद नाळे (वय 45) या युवकाचा समावेश आहे. दरम्यान या अपघातात 30 जण जखमी तर 10 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कणकवली येथील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातानंतर स्थानिक लोकांनी तसेच कणकवली येथील पोलिस उपनिरीक्षक विनोद कांबळे तसेच पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना रुग्णालयात हलविण्यात आले,या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 37 प्रवाशी होते. दरम्यान या अपघातात ठार झालेले आण्णा गोविंद नाळे हे ग्रीन प्लॅनेट या सेंद्रीय खतांच्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते. गोव्याला कंपनीच्या कामासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाने विडणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई-वडिल, भाऊ भावजय असा परिवार आहे.