मायणी -मायणी-म्हसवड रस्त्यावर असलेल्या मायणी पक्षी संवर्धन (पक्षी आश्रयस्थान) परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन मुलींना मोटारसायकलची जोराची धडक बसली. या अपघातात विद्या राजकुमार हिंगसे (वय 18) ही जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण दिव्या काशिनाथ तोडकर (वय 15) ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी विटा (सांगली) येथे पाठविण्यात आले. दिव्याची बहीण वंदना ही किरकोळ जखमी झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील नवी पेठ येथे सद्गरू सरुताई माउली मठ परिसरात राहणाऱ्या तीन मुली मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पक्षी आश्रयस्थान परिसरात वॉकला गेल्या होत्या. तेथे त्यांना मोटारसायकलने ठोकरले. या अपघातात विद्या हिंगसे हिच्या डोक्याला जबर मार लागून ती जागीच ठार झाली.
तिच्यासोबत असलेली दिव्या तोडकर ही गंभीर, तर वंदना तोडकर ही किरकोळ जखमी झाली आहे. विद्या हिंगसे ही भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकत होती. राज्य परीक्षा मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आजच जाहीर केला. त्यामध्ये विद्या उत्तीर्ण झाली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, विद्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कलेढोणच्या कुटीर रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत.