पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्यात वार करून गळ्याभोवती दोरी गुंडाळून बांधकाम मजूराचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुनील अमेल टूडू (वय 32, रा. लेबर कॅम्प बाणेर, मुळ. बनकी जोर सिक्रीपाडा, जिल्हा डुमका, झारखंड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.
याबाबत पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मीरा रेसिडेन्सी, बेशील गार्डन सोसायटी समोर, पॅनकार्ड क्लबरोड बाणेर येथे सोमवारी (दि.17) मध्यरात्री घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर सुनिल हा मुळचा झारखंड राज्यातील आहे. तो सोमवारी (दि.17) दुपारी बारा वाजताच्या सुमारास पुण्यात आला होता. तो लेबर कॅम्प बाणेर येथे राहत होता. मंगळवारी (दि.18) दुपारी बारा वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाला मीरा रेसिडेन्सी, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचा कॉल बाणेर पोलिसांना आला होता.
त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सुनिल याचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शी सुनिल याच्या डोक्यात मारहाण करून गळ्याला दोरी बांधून वरती अडकवलेला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती त्याच्यासोबतच रात्री होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात ते कैद झाले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास बाणेर पोलीस करत आहेत.