वाघोली,-पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने सुरुवातीला ऑनलाइन पेजेसवर रेटिंग देऊन दिवसाला एक ते आठ हजार रुपयांची कमाई करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. विश्वास संपादन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वाघोलीतील 25 वर्षीय तरुणाला पावणे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली येथील 25 वर्षीय तरुणाला मेसेज करून रेटिंग देण्याचे पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने जाळ्यात ओढले. सुरुवातीला काही रक्कम देऊन बीट कॉईन खरेदीबाबत सांगण्यात आले. तरुणाने बीट कॉईन खरेदी केल्याने थोडा नफा मिळाला. विश्वास संपादन केल्यानंतर तरुणाला शेअर मार्केट ट्रेडिंगबाबत सांगण्यात आले. ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केल्यानंतर तरुणाला नफा दिसू लागला.
गुंतवलेले पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला असता आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. एकूण पावणे सात लाख रुपयांची गुंतवणूक करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात धाव घेतली. पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.