कोल्हापूर – तरूणाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना करवीर तालुक्यातील घानवडे गावात घडली. पब्जी गेमच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. हर्षद डकरे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो सतत पब्जी खेळत असे, त्यामुळे घरात वारंवारवाद होत असत. त्यातूनच हर्षदने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
पब्जी खेळण्यावरून झालेल्या वादातूनच हर्षद याने विष प्राशन केले. कुटुंबातील सदस्यांना याबाबत समजल्यानंतर हर्षदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादर सुरू असताना हर्षदचा मृत्यू झाला. पब्जी गेमच्या नादाने तरुणाला प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पब्जी हा जीवघेणा खेळ जगभरात मोबाईलवर खेळला जाणारा लोकप्रिय खेळ आहे. भारतात देखील या खेळाचे अनेक चाहते आहेत. या खेळात तरूण आपला अमूल्य वेळ घालवतात. काही जण दिवसभरात आठ ते दहा तासाहून अधिक वेळ हा गेम खेळत असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले होते. या गेमपासून दूर राहण्याचे वेळोवेळी तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात येते.