वालचंदनगर – खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एका 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
जावेद अब्बास मुलाणी असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, मंगळवारी (23 ऑगस्ट) घडलेल्या या घटनेसंदर्भात त्याचा भाऊ नवाज अब्बास मुलाणी (रा. भरणेवाडी, ता. इंदापूर) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रफुल्ल रघुनाथ देवकाते (रा. पिंपळी ता. बारामती), विजय मोटे (रा. निरावागज ता. बारामती) व संदिप अरुण भोसले (रा. निमसाखर, ता. इंदापूर) या तिघा जणांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद मुलाणी याने वरील तिघा खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेतले होते. हे सावकार व्याजाच्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लाऊन त्याला वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते.
या जाचाला कंटाळून जावेद मुलाणी याने मंगळवारी (23 ऑगस्ट) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जंक्शन-कळस रस्त्यानजीक असलेल्या एका पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या संदर्भात सावकारांची पोलखोल करणारी चिठ्ठी पोलिसांना जावेद याच्या पॅंटच्या खिशामध्ये मिळाली आहे.
या घटनेतील तिघा सावकारांपैकी दोघा जणांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली असून, या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करीत आहेत.