40 वर्षे जुनी जट; अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रयत्न
पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नुकतेच भोर तालुक्यातील वेळू गावातील 65 वर्षीय महिलेची जटेच्या जाचातून मुक्तता करण्यात आली. ही जट सुमारे 40 वर्षे जुनी होती, तिची लांबी साडेनऊ फूट इतकी होती. संस्थेतर्फे आतापर्यंत काढण्यात आलेली ही सर्वात लांब जट असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.
जिल्हातील वेळू गावातील शांताबाई शिंदे यांच्या डोक्यात गेल्या 40 वर्षांपासून जट तयार झाली होती. एकदा सौदत्ती देवीच्या मंदिरात जट काढली होती; पण जट काढल्यानंतर 15 दिवसांनी ऍक्सिडेंटमध्ये मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांना समाजातील लोकांनी भीती घातली होती. जट कापल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. शिंदे यांच्या डोक्यात काही दिवसांनी पुन्हा जट तयार झाली.
गेली 22 वर्षे ही जट डोक्यात वाढत होती. जटेमुळे पाठ, मान, हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे,केस धुणे तसेच डोळ्याचा त्रास सुरू झाला. डोळे तपासायला शिंदे या डॉ. रामचंद्र कुदळे यांना डोळे दाखवायला गेले असता, कुदळे यांनी शांताबाई यांच्या डोक्यातील जट पाहीले व त्यांना जटेमुळे कसा त्रास होत असून, डोळ्यांचे ऑपरेशन करायचे म्हटले तर जट काढावी लागेल असे सांगितले. पण एकदा जट काढल्यानंतर घडलेला प्रसंगाच्या भीतीमुळे जट काढायची नाही असे त्यांनी ठरवले होते. त्यांनतर कुदळे आणि अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी जटमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देत, ती काढल्याने काहीही वाईट होणार नसल्याचे शिंदे यांना समजावून सांगितले. बरेच प्रयत्न केल्यानंतर शांताबाई या जट काढण्यास तयार झाल्या.
त्यानुसार जाधव यांनी वेळू गावी जाऊन जटेविषयी माहिती दिली, तसेच इतरांनाही जट निर्मूलनाबद्दल सांगण्यात आले. यावेळी महा. अंनिस राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, रामचंद्र कुदळे तसेच शांताबाई यांच्या शेजारीच राहणाऱ्या मैत्रीणी व कुटुंबाच्या उपस्थितीत शांताबाईचे जट निर्मूलन करण्यात आले.