संगमनेर – शेतात काम करत असताना अचानक बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने एका 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारात शनिवारी (दि.25) घडली. शीलाबाई लहानू पानसरे असे मृत महिलेचे नाव आहे.
शीलाबाई शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जाखोरी शिवारातील आपल्या शेतात काम करत होत्या. यावेळी त्यांना अचानक समोर बिबट्या दिसला. अचानक समोर बिबट्याचे दर्शन झाल्याने घाबरून गेलेल्या शीलाबाई यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तत्काळ वनविभागाला कळवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग एकचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनरक्षक एस. आर. पाटोळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुबियांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली.
मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालामध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून, मृत महिलेचा अंगावर कोणतीही जखम प्राथमिक तपास दिसली नसल्याने डॉक्टरांनी सांगितले. वनविभागाकडून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाला, तरच मदत मिळते, असे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांनी सांगितले.