नवी दिल्ली – देशभर उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवाणग्या एकाच ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्याची यंत्रणा लवकरच सक्रिय होणार आहे. यासाठीच्या एक खिडकी योजनेसंदर्भात उद्योग मंत्रालय विविध विभागाशी चर्चा करीत आहे.
उद्योग आणि कंपनीव्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, या योजनेचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे नवीन उद्योग करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना अतिशय फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारच्या 17 मंत्रालयाचा आणि 14 राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यानंतर हळूहळू राष्ट्रीय स्तरावर ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्या करण्यात येणार आहेत. नवीन गुंतवणूकदारांना किंवा उद्योगांना एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी कोणते राज्य, त्या राज्यातील कोणती जागा उपयुक्त आहे, ही जमीन सहज कशी उपलब्ध होईल, हा उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत, या परवानग्या कधी मिळतील याची इत्यंभूत माहिती या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
सध्या भारतात नवा उद्योग सुरू करणाऱ्यांना किंवा गुंतवणूक करणाऱ्यांना विविध प्रश्नांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवा उद्योग सुरू होण्यास कधीकधी अनेक वर्षाचा कालावधी लागतो. योजना सुरू करण्यात आल्यानंतर उद्योग सुरू करणाऱ्यांना किंवा गुंतवणूकदारांना कमीत कमी वेळेत आपला उद्योग सुरू करता यावा अशी यामागील भूमिका आहे.
केंद्र सरकार आणि विविध राज्य आपल्या क्षेत्रांमध्ये नवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी नव्या उद्योगांना मिळत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. या एक खिडकी योजनेमुळे या सर्व अडचणी संपुष्टात येतील असे गोयल यांनी सांगितले.