लोणी परिसरात सुसज्ज क्रीडा अकादमी उभारणार : पुनीत बालन

पुणे  – इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने लोणी परिसरात दहा एकर जागेची उपलब्धता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज क्रीडा अकादमी उभारण्यात येणार आहे. याद्वारे ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. यासह लोणी गावाचा नावलौकीक राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात वाढविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.

 

लोणी (आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या दोन मजल्यांच्या कामासाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमीपूजन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन पुनीत बालन आणि आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, वस्तू आणि सेवाकर उपायुक्त अरिफ मुलाणी, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक प्रकाश सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांबहाते, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, चेतन लोखंडे, संतोष पडवळ, उपसरपंच राणी गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव, प्राचार्य गोरक्षनाथ दळवी, सावळेराम नाईक, दिलीप वाळुंज, सोमनाथ कदम, उद्योजक राजेश वाळुंज, ग्रंथमित्र रमेश सुतार आदी उपस्थित होते.

 

“सामाजिक कामात कधीही राजकारण येता कामा नये. इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात देखील सहा ते सात हजार गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप केले. त्याच संख्येत शाळांना संगणक वाटप देखील केले असून, 1 हजार 084 शाळांमध्ये पुस्तकपेढी स्थापन केली आहे. तर लॉकडाऊनच्या काळात पोलिस, आरोग्य कर्मचारी, वृत्तपत्र वितरकांसह हजारो गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. शाळेच्या इमारतीचे काम देखील वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे,’ असे बालन यांनी सांगितले.

 

मी शहरात राहतो. पण काम ग्रामीण भागात करतो. खेड्यांच्या विकासासाठी झटतो याचा अर्थ मी मागच्या जन्मी शेतकरी कुटुंबात जन्मलो असेन, असेही बालन यांनी नमूद केले. तर इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरात 10 हजार वृक्षांची लागवड करणार असल्याचे धारिवाल यांनी सांगितले.

 

माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून एक कोटी रुपये खर्च करुन पहिल्या मजल्या काम केले. त्यानंतर आर्थिक कमतरता भासल्याने चेतन लाखंडे यांच्या माध्यमातून पुनीत बालन यांची भेट झाली. त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे काम मार्गी लागल्याचे गायकवाड म्हणाले.

 

यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान शाळेच्या प्रस्तावित प्रतिकृतीचे अनावरण झाले असून, पहिल्या टप्प्यासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश प्रबोधिनीकडे सुपूर्द करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ते तानाजी राजगुडे यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर लोखंडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.