मंचर, (प्रतिनिधी) – पारगाव (ता. आंबेगाव) येथील लबडे मळा येथे सोमवारी (दि. 16) रात्री पावणे अकराच्या दरम्यान सागर जयराम ढोबळे यांच्या घराच्या अंगणात बिबट्याने जवळ जवळ 10 ते 15 मिनिटे फेरफटका मारला असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
पारगाव लबडे मळा परिसरातील शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी घराबाहेर असतो. काही दिवसांपूर्वी गावठाण परिसरात भरवस्तीत देखील बिबट्याचा शिरकाव झाल्याची घटना घडली होती.
त्यामुळे आता परिसरात भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची वनविभागाने तत्काळ दखल घेऊन त्वरित पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक शेतकर्यांनी वनविभागाकडे केली आहे.