शिरुर, (वार्ताहर)- शिरूर येथील सोन्या-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी धरमचंद भवरीलाल यांनी अमोल प्रल्हाद जाधव (रा. मूळगाव कापडसिंगी ता. सेनगाव जि.हिंगोली) याला गरिबीची परिस्थिती असल्याने त्याला डॉक्टर (एमडी) होण्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अमोल जाधव हा बंजारा समाजातील एका तांड्यावर राहणारा मुलगा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. सुट्टीमध्ये आईवडीलांबरोबर रस्त्यावरील दगड फोडून मिळणाऱ्या पैशात शिक्षण घेतले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या मदतीने पूर्ण केले.
पुढे बारावीनंतर मेडिकल नीटच्या परिक्षेत 490 गुण मिळवून त्याने पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला आर्थिक गरज भासू लागली. शेवटी ही माहिती शिरूरमधील आदर्श शिक्षक बाळासाहेब डांगे यांनी धरमचंद भवरीलाल यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यांनी समक्ष या मुलाला बोलावून त्याची विचारपूस केली, त्याची चौकशी केल्यावर त्याने सांगितलेली कहाणी ऐकून धरमचंद भवरीलाल यांनी मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, गणवेश, दरमहाची खाणावळसाठी लागणारी रक्कम लगेच दिली.
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात योगदान
धरमचंदशेठ भवरीलाल हे दरवर्षी अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करतात, त्यांनी मदत केलेले अनेक विद्यार्थी डाँक्टर, इंजिनिअर झाले आहेत. करोना काळात त्यांनी अती गरीब कुटुंबाना मोफत किराणा वाटप केला आहे.
पाण्याचे टँकर मोफत चालू केले होते. सध्या धरमचंद भवरीलाल हे विद्याधाम प्रशाला शिरूरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. दानशुर व्यक्तीच्या सहकार्यामुळे असंख्य गरिब विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे पाठबळ मिळाले आहे.