नमस्कारासन हे दंडस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना दोन्ही हात छातीच्या खोबणीपाशी घ्यावेत. श्वास घेत टाचा वर उचलत हातांची नमस्कार स्थिती घ्यावी. या स्थितीत जरा वेळ श्वास रोखून धरावा. डोळे मिटलेले असावेत. जेवढा वेळ श्वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा नंतर श्वास सोडत आसन सोडत टाचा जमिनीला टेकवाव्यात व हातांची नमस्कार स्थिती सोडावी. हे आसन नमस्कारासन म्हणून परिचित आहे. यामध्ये श्वास घेत आपण छाती वर उचलतो म्हणजेच छातीत पूर्णपणे श्वास भरून घेतो व थोडा वेळ रोखून मग हळूहळू श्वास सोडत आसनस्थिती सोडतो.
टाचा उचलल्यामुळे पोटऱ्यांना व गुडघ्यांना चांगला व्यायाम मिळतो. हात कोपरात दुमडून आपण नमस्कार स्थिती घेतल्याने खांदे-दंड बळकट होतात. अनेकदा कॉम्प्युटरवर बसून खांदे व दंड दुखतात; परंतु या आसनामुळे खांदे व दंड यांना योग्य व्यायाम मिळतो. श्वास रोखल्यामुळे व दीर्घ श्वसन केल्यामुळे हृदय मजबूत व्हायला मदत होते. सरावाने हे आसन बराच वेळ टिकवता येते. डोळे मिटून या आसनाशी तंद्रूप व्हावे.
सुरुवातीला 15 सेकंद टिकवावे मग हळूहळू कालावधी वाढवता येतो. सूर्यनमस्काराच्या आसनांच्या साखळीतील हे प्रथम आसन आहे जे आपल्या शरीराला, हातापायांना बळकटी तर देतेच शिवाय शरीर सौष्ठत्व व सौंदर्य प्राप्त करून देते म्हणून रोज नियमित हे आसन करावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात स्वच्छ मनाने रोज मोकळ्या मैदानात अथवा थोड्याशा बंद पण रिकाम्या जागेत सूर्योदयाच्या वेळी सूर्यास वंदन करून हे आसन करावे. या आसनामुळे शारीरिक, बौद्धिक विकास होतो, शरीराची चपळाई वाढते. आंतरेद्रीय व स्नायू बलवान होण्यास मदत होते.