शेअर मार्केट : एक ट्विट अन् अदानी ग्रुपला 1.03 लाख कोटींचा फटका

नवी दिल्ली – गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहात गुंतवणूक करणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांची काही खाती गोठवली असल्याचे वृत्त पसरल्यानंतर सोमवारी या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात तब्बल 25 टक्‍क्‍यापर्यंत घट झाली. त्यामुळे अदानी ग्रुपच भांडवली बाजारातील मूल्य तब्बल 1 .03 लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. यासाठी एक ट्विट कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. मात्र खाती गोठवण्याचे वृत्त पूर्णतः चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्टीकरण अदानी समूहाने जारी केले आहे.

अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या परदेशातील तीन गुंतवणूकदारांची नॅशनल सिक्‍युरिटीज डिपॉझिटरी (एन एस डी एल) मधील डिमॅट खाती गोठवण्याचे वृत्त पसरले होते. अलबला इन्वेस्टमेंट फंड्‌स, क्रेस्ट फंड, एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या कंपन्यांची खाती गोठवली असल्याचे वृत्त पसरले होते.

या कंपन्यांनी अदानी समूहातील विविध कंपन्यात दीर्घकाळापासून मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट, अदानी स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस लिमिटेड या कंपन्यांनी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, तीन गुंतवणूकदाराची डिमॅट खाती गोठवली असल्याचे वृत्त निराधार आहे.

या चुकीच्या वृत्तामुळे अदानी समुहाच्या प्रतिष्ठेवर आणि या आर्थिक मूल्यांकनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही डिपॉझिटरीच्या संबंधित विभागाला या संदर्भात माहिती दिल्यानंतर या विभागाने आम्हाला लेखी ई-मेल करुन या तीन गुंतवणूकदारांची खाती गोठवली नसल्याचे सांगितले आहे. मात्र वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या तीन कंपन्यांची डिमॅट खाती गोठलेल्या अवस्थेत दाखविण्यात आलेली आहेत. मात्र निबंधकांनी नंतर ही गोठविली नसल्याचे लेखी सांगितले आहे.

7.78 अब्ज डॉलरची गुंतवणूक
या तीन गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील कंपन्यामध्ये तब्बल 7.78 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. या तीन कंपन्यांनी मूळ अदानी इंटरप्राईजेस या कंपनीत सुरुवातीपासून गुंतवणूक केली होती. त्यानंतर अडाणी समूहापासून वेगवेगळ्या कंपन्या निर्माण करण्यात आल्या. त्या प्रमाणात या तीन गुंतवणूकदाराकडे संबंधित कंपन्यांचे शेअर देण्यात आले आहेत. अदानी समूह वेगाने वाढणारा समूह असून आगामी काळात विविध क्षेत्रात विस्तारीकरणाच्या योजना आखण्यात आल्या आहेत. या योजनांच्या आधारावर समूह आगामी काळात वाटचाल करील असे समूहाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.