सांगली – सांगलीमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडून सहा वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले, तर दोघे जण जखमी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. ही घटना सांगली-हरिपूर रस्त्यावर शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगली शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहा वर्षांची ऋचा सुशांत झेंडे सांगली-हरिपूर रस्त्यावरील काळी वाट भागात कुटुंबासोबत राहत होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास ती आपल्या काकासोबत दुचाकीवरुन घरी निघाली. यावेळी चौकात ते वळत असताना हरिपूरकडे जाणारा एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. ट्रकचालकाला वेग नियंत्रित करता न आल्यामुळे त्याने दुचाकीला उडवले.
धडकेत ऋचा रस्त्यावर आदळली, तर तिचा काका दुसऱ्या बाजूला फेकला गेला. पुढे जाऊन ट्रकने आणखी एकाला धडक दिली आणि तो पुढच्या कमानीवर धडकून रस्त्याच्या कडेला थांबला. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने ट्रकचालकाला बाहेर खेचत बेदम मारहाण केली.
दरम्यान, काही तरुणांनी ऋचाला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे समजताच जमावाने चालकाला आणखी बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. या प्रकारामुळे सांगली-हरिपूर रोडवर तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजतात ग्रामीण आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला हटवून ट्रकचालकाला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.