भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांची माहिती
वेळप्रसंगी आता खासगी डॉक्टर मदतीला येणार
अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामदूत व शहरदूत काम करणार
भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे – सातारा महामार्गावरील एखाद्या खासगी हॉस्पिटलची निवड करून त्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करून भोर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्हा परिषद उपचार केंद्रासाठी संबंधित हॉस्पिटलबरोबर करार करणार असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले. करोनाबाबत तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी आणि खासगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर ही बैठक झाली. यावेळी तहसीलदार अजित पाटील उपस्थित होते.
पुढील दहा दिवस पुणे शहरात कडक लॉकडाऊन केले जाणार आहे, त्यामुळे पुणे येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांबाबत त्या त्या कंपनी मॅनेजर यांच्यावर करोनाच्या दक्षतेबाबतची जबाबदारी राहणार असून, याबाबत प्रशासन त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहे. वेळप्रसंगी डॉक्टर कमी पडले तर खासगी डॉक्टरांना याकामी मदतीला घेण्यात येणार असून त्यांनी होकार दिला आहे. भोर शहर बंद राहणार असून अत्यावश्यक कामांसाठी ग्रामदूत व शहरदूत नागरिकांची कामे करतील, असेही जाधव
यांनी सांगितले.
दिवसरात्र नाकाबंदी
खेडशिवापूर, नसरापूर, कापूरहोळ व माळवाडी येथे दिवसरात्र नाकाबंदी केली जाणार आहे. ग्रामस्तरावर समिती करून त्यात सरपंच, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक यांची नेमणूक पुढील दहा दिवस गावागावांत करण्यात येणार आहे. बाहेरगावी जाणारे व येणारे, गंभीर आजारी असलेले वयोवृद्ध यांचे सर्वेक्षण करून करोनाची लक्षणे असलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. समिती कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रभारी अधिकारी नेमला जाणार आहे. पाच गावांना एक याप्रमाणेच 50 क्षेत्रीय अधिकारी नेमले असून, 8 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर
भोर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू केलेले करोना केंद्र, आरक्षित केलेली खासगी वसतिगृह येथे 150 रुग्णांची राहण्याची सोय केली आहे. भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 बेडचे एक व्हेंटिलेटरसह सर्व सुविधा असलेले कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.