पुणे: गोड चवीच्या, रसाळ आणि नैसर्गिकरित्या पिकविलेला गावरान हापूसची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. नेहमीच्या तुलनेत 15 ते 20 विलंबाने ही आवक सुरू झाली आहे. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील घाऊक बाजारात गावरान हापूस आणि पायरी आंबा विक्रीसाठी दाखल झाला. बाजारात हापूसच्या प्रतिडझनास 200 तर पायरीला 150 रुपये भाव मिळाला. बदललेल्या हवामानामुळे यावर्षी आवक कमी होणार असून, हंगाम 30 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती व्यापारी यशवंत ऊर्फ तात्या कोंडे यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील बेलवडे गावातून हापूसच्या 4 क्रेटस् तर पायरीच्या 1 क्रेटची म्हणजेच एकुण 47 डझन आंब्याची बाजारात आवक झाली. नेहमीच्या तुलनेत उत्पादन घटले आहे. याविषयी शेतकरी विष्णू पायगुडे म्हणाले, शेतातल्या बांधावर 50 ते 55 झाडे लावली आहेत. यंदा थंडी जास्त काळ नसल्याने झाडांना मोहोर लागला नाही. त्यामुळे, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले. आज अवघा 5 क्रेटस् मधून आंबा विक्रीसाठी आणला होता. गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी 150 क्रेटस् माल विकला गेला होता.
कोट वटपौर्णिमेला आंब्याला मागणी जास्त असते. एरवी वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारात 400 ते 450 क्रेटस् आंबा दाखल होतो. मात्र, यंदा लांबलेला पाऊस, वातावरणातील थंडी न पडल्याने झाडाला अपेक्षित मोहोर लागला नाही. परिणामी, अपेक्षित फळधारणा न झाल्याने उप्तादन घटले आहे. तसेच, करोना संसर्ग, बंद असलेले मार्केट यार्डाचाही आवकवर परिणाम झाला आहे.
बाजारात दाखल होत असलेला दर्जेदार नसून, आकाराने लहान आहे. आवक अत्यल्प व मागणी चांगली असल्याने आंब्याला चांगला भाव मिळाला. तरीही हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.