नीरजसह एकूण 11 खेळाडूंची खेलरत्नसाठी निवड

इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने दिले जाणार पुरस्कार

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रासह देशातील एकूण 11 खेळाडूंची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने हा पुरस्कार दिला जाण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

नीरजसह टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंसह महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचीही निवड करण्यात आली आहे. नीरज चोप्रा, क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवि दहिया, महिला मुष्टियुद्ध खेळाडू लवलीना बोरगोहेन, हॉकी संघाचा गोलकिपर पी.आर. श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनी लेखरा, कृष्णा नागर आणि एम. नरवाल यांच्याही नावाचा या यादीत समावेश आहे.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या मानाच्या पुरस्कारांची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. गेल्या वर्षी 5 खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यंदाच्या खेळाडूंच्या शिफारस यादीत ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सरस कामगिरी केलेल्या 4 पदक विजेत्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. तर, पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या 5 खेळाडूंचाही समावेश झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने 11 खेलरत्न पुरस्कारांसह तब्बल 35 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखऱ धवन याचाही समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.