तुळजापूर – महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराने सदा भक्तांच्या उदो-उदोने दुमदुमणारी ही पवित्र भूमी आता ड्रग्जच्या काळ्या कारनाम्यांनी बदनाम झाली आहे. मुंबईपासून 467 किलोमीटर दूर तुळजापुरात ड्रग्जचा बाजार कसा पोहोचला? पुजारीच पेडलर कसे बनले? आणि राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात कसे गुंतले? धाराशिव सत्र न्यायालयात दाखल झालेले 10,000 पानांचे चार्जशीट या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करते.
पत्त्याच्या सवयीतून ड्रग्जचा प्रवेश –
पोलिसांच्या तपासानुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात विनोद उर्फ पिंटू मुळे नावाच्या तरुणापासून झाली. मुंबईत काही काळ वास्तव्यास असताना पिंटूला पत्ते खेळण्याची सवय लागली आणि त्यातूनच ड्रग्जची ओळख झाली. मुंबईतील पत्त्याच्या क्लबमध्ये त्याची वैभव गोळे याच्याशी भेट झाली. तुळजापूरला येणे-जाणे सुरू असताना पिंटूचा संपर्क माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कन्या, स्वराज तेलंग आणि परमेश्वर गोठण कदम यांच्याशी आला. यातूनच ड्रग्ज तुळजापुरात पोहोचले.
फॉर्च्यूनरने ड्रग्जची वाहतूक –
सुरुवातीला वैभव गोळे पार्सलद्वारे तुळजापुरात ड्रग्ज पाठवायचा. नंतर तुळजापूरच्या या मंडळींनी स्वतः मुंबईतून ड्रग्ज आणण्यास सुरुवात केली. यासाठी बापू कन्याची फॉर्च्यूनर गाडी तीन-चार वेळा वापरल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही गाडी नुकतीच जप्त केली आहे.
तरुणाईला ड्रग्जच्या जाळ्यात ओढले –
पिंटू मुळे याने तुळजापुरात ड्रग्ज आणण्यास सुरुवात केल्यानंतर मुंबईतील ड्रग्ज थेट तुळजापुरात पोहोचले. राजकीय नेत्यांच्या मुलांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईत ड्रग्ज आणण्यासाठी पाठवले. 100 रुपयांचा ड्रग्ज आणून त्यातील 80 रुपयांचा नेत्याच्या मुलांना आणि 20 रुपयांचा स्थानिक तरुणांना विकले जायचे. यामुळे तुळजापूरच्या तरुणाईला ड्रग्जचे व्यसन लागले.
मुंबईतील तिघांचे कनेक्शन –
तुळजापुरात ड्रग्ज पुरवणाऱ्या प्रमुख तिघांमध्ये संतोष खोत, वैभव गोळे आणि संगीता गोळे यांचा समावेश आहे. संगीता गोळेच्या सांगण्यावरून संतोष खोत तुळजापूरच्या मंडळींशी संपर्कात होता. संगीताचे सुमारे 5 कोटी आणि संतोष खोतचे 1 ते 1.5 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. सुरुवातीला हॉटेल्समधून मर्यादित लोकांना ड्रग्ज मिळायचे, पण नंतर मोकळी मैदाने, चौक किंवा कुठेही डिलिव्हरी सुरू झाली. एक ग्रॅम ड्रग्जची किंमत 3,000 रुपये होती, जी दोन भागांत विकली जायची.
आप्पासाहेब पवारचा सहभाग –
या प्रकरणात आप्पासाहेब पवार नावाचा आरोपीही समोर आला आहे, जो तुळजापुरात बांधकाम साहित्याचा व्यवसाय करतो. त्याने ग्राहकांचे पैसे थेट ड्रग्ज पुरवठादारांच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले. यामुळे त्याच्यावरही पोलिसांचा ससेमिरा आहे. ड्रग्ज व्यवहारात व्हॉट्सअॅप कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. ऑर्डर आणि डिलिव्हरीचे ठिकाणही याच माध्यमातून ठरवले जायचे.
चार्जशीट आणि पुढील तपास –
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 36 आरोपी असून, 14 जणांना अटक झाली आहे, तर 22 फरार आहेत. पोलिसांनी 10,000 पानांचे चार्जशीट धाराशिव सत्र न्यायालयात दाखल केले आहे, ज्यात प्रत्येक आरोपीची भूमिका, संवाद, बँक व्यवहार आणि त्यांचे परस्परसंबंध स्पष्ट केले आहेत. या प्रकरणात 80 हून अधिक लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या, कारण त्यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी आर्थिक व्यवहार झाले होते.
पुजारी आणि राजकीय कनेक्शन –
धक्कादायक बाब म्हणजे, तुळजाभवानी मंदिरातील काही पुजारी ड्रग्ज पेडलर असल्याचे समोर आले आहे. पालिकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे यांनी सांगितले की, 11 पुजाऱ्यांची नावे समोर आली, पण यातील बहुतेक मंदिरात येतच नाहीत. दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवर बंदी घालण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे कार्यकर्तेही या प्रकरणात गुंतल्याने खळबळ उडाली आहे.
तुळजापूरची बदनामी –
तुळजापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला ड्रग्ज प्रकरणाने काळिमा फासला आहे. तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकली असून, अनेकजण फरार झाले आहेत. पोलिसांना या रॅकेटचे मूळ उखडण्यासाठी कसून तपास करावा लागेल, जेणेकरून तुळजापूरचे पावित्र्य पुन्हा प्रस्थापित होईल.