डेंग्यूच्या रुग्णांत तिपटीने वाढ

तापाचे रुग्णही दुपटीने वाढले : 10 हजार 218 रुग्णांना ताप

स्वाईन फ्लूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू

शहरामध्ये जानेवारी ते मे या कालावधीत डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. मात्र, त्यातील एकाही रुग्णाला डेंग्यूची लागण झाली नाही. जून आणि जुलै अशा दोन महिन्यांमध्ये तब्बल 37 जणांना डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी अद्याप त्यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तुलनेत सात महिन्यांच्या कालावधीत स्वाइन फ्लूचे 19 रुग्ण आढळले. तर, त्यातील तिघांना प्राण गमवावे लागले.

पिंपरी  – शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. महिनाभरात 29 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले आहे. तापाचे रुग्णही गेल्या महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. बदलत्या वातावरणाचा आणि डासांचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम जाणवू लागला आहे.

पावसाळ्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाने प्रामुख्याने विविध आजार बळावले आहेत. त्यातही डासांद्वारे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे 43 संशयित रुग्ण आढळले होते. त्यांची तपासणी केली असता 9 रुग्णांना प्रत्यक्ष लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर, जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे 107 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 28 रुग्णांना प्रत्यक्ष लागण झाली आहे. तापाच्या रुग्णांमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये दुपटीने वाढ आहे. जून महिन्यात तापाचे 5 हजार 168 रुग्ण होते. तर, जुलै महिन्यामध्ये तब्बल 10 हजार 218 रुग्णांना ताप आला होता. जुलैमध्ये मलेरियाचे देखील 3 रुग्ण आढळले आहेत.

शहरामध्ये डासांमुळे होणाऱ्या विविध आजारांबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी नुकतीच आयुक्‍तांसमवेत बैठक झाली. डास नियंत्रणाबाबत त्यांनी विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत. डेंग्यू किंवा स्वाइन फ्लूचे लक्षण आढळल्यास तातडीने जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

– डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.