मुंबई -रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची तीन दिवसांची बैठक मंगळवारपासून सुरू होणार असून चार एप्रिल रोजी बॅंक मुख्य व्याजदरात म्हणजे रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे.
बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थ मंत्रालयातील अधिकारी, उद्योग क्षेत्रातील अधिकारी, ठेवीदारांची संघटना आणि छोट्या उद्योगाच्या संघटनेबरोबर चर्चा केलेली आहे. या सर्वांनी औद्योगिक उत्पादनाचा दर वाढावा याकरिता व्याजदरात कपात करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
एचडीएफसी रोखे व्यवहार विभागाचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी सांगितले की, बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले की, महागाई आणखीही कमी असल्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बॅंकेने हा कमी व्याजदर व्यावसायिक बॅंका ग्राहकांना लवकर कसा देतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याअगोदर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची आकडेवारी जाहीर झालेली आहे. त्यात बरीच घट झालेली आहे. त्यामुळे भांडवल सुलभता वाढण्याची गरज आहे.