गणेशोत्सवाच्या तोंडावर मिठाई दुकानांची कसून तपासणी

पुणे – गणेशोत्सव काळात भाविकांना प्रसाद, खवा, मोदक अशा अन्नपदार्थांमधून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) तपासणी मोहीम सुुरू केली आहे. शहर परिसरातील विविध भागात अन्न विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत असून काही विकेत्यांकडील पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण गणेशोत्सव काळात ही तपासणी सुरू राहणार आहे.

गणेशोत्सवात शहरात भाविकांची शहरात मोठी गर्दी होते. यावेळी अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले नाहीत, तर त्यातून विषबाधा होऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी शहर परिसरात पाहणी करत आहेत. उत्सव काळात मिठाईयुक्त पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. याचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून पदार्थांमध्ये भेसळ करुन ते विकले जातात. गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान अधिकाऱ्यांनी 40 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त केला होता. गुजरातवरून आलेला हा खवा नष्ट करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर यंदाही कडक तपासणी सुरू आहे. मोदकांपासून ते उत्सव काळात विक्री होणाऱ्या सर्व मिठाईवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी 16 अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.