वाशिंग्टन – जागतिक आर्थिक स्थितीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सावधगिरीचा इशारा दिला आहे. चालू वर्षात म्हणजे 2023 मध्ये जगातील एक तृतीयांश अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडणार असल्याचे आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे. अमेरिका, चीन आणि युरोपीय संघ येथे मंदी असण्याची शक्यता वर्तवताना हे वर्ष 2022 च्या तुलनेत अधिक खडतर असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या बाबतीत रशियाचे जे धोरण तेच भारताबाबत चीनचे – राहुल गांधी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्द दहा महिने झाले तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याशिवाय वाढती महागाई, वाढते व्याजदर आणि चीनमध्ये नव्याने आलेली करोनाची लाट या पार्श्वभूमीवर सीबीएएस न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रविवारी ही भीती व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की ज्या देशांमध्ये मंदी नाही त्या देशांमध्येही या मंदीचे सावट असणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या वर्षी आर्थिक विकासाचे जे अनुमान वर्तवले होते ते नंतर कमी होते.
2021 मध्ये जागतिक विकास दर 6 टक्के होता. तो 2022 मध्ये 3.2 टक्के होता. मात्र हाच दर आता 2023 मध्ये 2.7 टक्के असणार आहे. जागतिक आर्थिक संकट आणि कोविड महामारीचा काळ सोडला तर हा विकास दर 2001 नंतरचा सगळ्यांत कमी दर असणार आहे. जॉर्जीवा म्हणाल्या की पुढचे दोन ते तीन महिने चीनसाठी अत्यंत कठिण असणार आहेत. तेथील विकासदराचा विभागीय आणि जागतिक वाढीवर परिणाम होणार आहे.