फलटण (प्रतिनिधी) – वडले, ता. फलटण येथील करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या गावातीलच एका 52 वर्षांच्या व्यक्तीचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वडले येथे करोनाबाधितांची संख्या तीन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विक्रोळी येथून वडले येथे आलेल्या 35 वर्षांच्या युवकाला करोनाची बाधा झाल्याचे 30 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांची कोव्हिड चाचणी यापूर्वीच पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील 52 वर्षांच्या व्यक्तीचा रिपोर्ट काल (दि. 6) पॉझिटिव्ह आला आहे. वडले, बरड व सस्तेवाडी येथील 11 जणांचे अहवाल अनिर्णायक (इनकन्क्लुसिव्ह) आल्याने त्यांच्या घशातील स्राव पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. वडले, बरड व फलटण येथील हाय रिस्क संपर्कातील 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.