शेवगाव तालुक्‍यात आढळला तिसरा करोना पॉझिटिव्ह रुग्ण 

शेवगाव  -शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव शिंगोरी येथील 30 वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाल्याने तालुक्‍यातील करोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली. त्यामुळे तालुका प्रशासनासह नागरिक चांगलेच हादरले आहेत.

करोनाबाधित युवक व त्याचा एक नातेवाईक असे दोघे कल्याण येथे फायर ब्रिगेड विभागामध्ये कार्यरत आहेत. शनिवारी (दि.30) दोघे कल्याणहून घरी गावी आले होते. त्यातील एकाला रात्री अस्वस्थ वाटत असल्याने दोघेही पहाटेच नगर येथील सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे त्यांची तपासणी केली असता त्यातील एकजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला.

प्रशासनाने आज सकाळी बाधित युवकाचे आई, वडील, आजी, पत्नी, दोन मुले, बहीण व तीची दोन मुले, भाऊ, भावजयी अशा अकरा जणांना ताब्यात घेऊन दोन स्वतंत्र 108 रुग्णवाहिकांमधून नगरला सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसीलदार मयुर बेरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, विस्ताराधिकारी सुरेश पाटेकर, संजय जगताप, हादगाव आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप घुले यांनी राणेगाव करोना ग्रामसुरक्षा समितीची बैठक घेतली. त्यात हा युवक आपल्या सहकाऱ्यासह शनिवारी घरी मुक्कामी आला असल्याचे निष्पन्न झाले.

तहसीलदार अर्चना भाकड यांचे आदेशानुसार बाधित रूग्णाची वस्ती तसेच जवळच्या अन्य तीन वस्त्या व राणेगावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्याच्या सात पथकाद्वारे तेथील सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सरपंच राणोजी वाघ, पोलीस पाटील भाऊसाहेब डोंगरे, ग्रामसेवक राजीव लड्डा, उपकेंद्राचे डॉ. पी आर गलांडे स्थानिक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.