त्या वळणावर एक उसासा

पाऊस हल्ली बरेचवेळा, प्रिय सख्याला भेटत असतो
गुपीत माझ्या हृदयामधले, थेंबांमधुनी सांगत असतो
उगीच माझी खोडी काढत, आणिक मजला छळण्यासाठी
त्याच्या माझ्या भेटीमध्ये,अनेक वेळा घोळत असतो
हलका येऊन अंगावरती, धुंद होउनी स्पर्शुन जातो
टिपता सारे यौवन माझे, गात्रामधुनी रुजवत असतो
चिंब माझिया देहावरची, वळणे त्याला वेडी करती
त्या वळणावर एक उसासा, त्याचा मजला भुलवत असतो
गालावरची खळी रुपेरी, ओठांवरची मोहक लाली
देऊन लेणे असे भरजरी, मला असा तो खुलवत असतो
त्याला भावे प्रेम आपुले म्हणून, असा तो रोज येतसे
भेट आपुली घेऊन जवळी, अंगोपांगी मिरवत असतो

– मानसी चापेकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)