वाहतूक नियम पाळणाऱ्यांना ‘आभार’ कूपन : खाद्यपदार्थांवर ताव

पुणे – शहराच्या प्रत्येक भागामध्ये “वेगळी खाऊगल्ली’ पाहायला मिळते. पुणेकर आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ हे जणू समीकरणच आहे. या समीकरणाला वाहतूक विभागाचे “आभार’ देखील अपवाद नाही. वाहतूक विभागाकडून देण्यात येणाऱ्या “आभार’ कूपनचा सर्वाधिक अर्थात 65 टक्‍के कूपनचा उपयोग केवळ “प्रसिद्ध’ खाद्यपदार्थांसाठी करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांनी वाहन थांबविले आणि वाहनावर कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यास वाहनचालकाला वाहतूक पोलिसांकडून “आभार’ कूपन देण्यात येते. गेल्या काही महिन्यांभरापासून ही योजना वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. या योजनेला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

वाहनचालकाला मिळालेल्या या कूपनवर असणाऱ्या क्रमांकानुसार वाहनचालकाला हॉटेल्स आणि विविध दुकानांमध्ये सवलत दिली जाते. सुमारे 150 व्यावसायिकांचा सहभाग असणाऱ्या योजनेमध्ये पुणेकरांनी खाद्यपदार्थांनाच पसंती दिली असल्याचे चित्र आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत सुमारे 10 हजार जणांना कूपन देण्यात आले. त्यापैकी 3,200 कूपन्सचा वापर पुणेकरांनी केला.

या कूपन्सपैकी अधिक कूपन्सचा वापर “चितळे स्वीटस’, “रुपाली हॉटेल’, “तिरंगा बिर्याणी’ या “लोकप्रिय’ आणि “विशेष’ ओळख असणाऱ्या ठिकाणांसह “व्हीनस ट्रेडर्स’ला देखील पुणेकरांनी “विशेष’ पसंती दाखविली आहे.

…लवकरच “फूड डिलेव्हरी साईटस’चा समावेश
वाहतूक पोलिसांच्या “आभार’ योजनेमध्ये लवकरच घरपोच आवडीचे खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या “फूड डिलेव्हरी साईटस’चा समावेश करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले. नागरिकांमध्ये विशेषत: “खाद्यपदार्थ प्रेमी’ अर्थात “फूडीं’चे विशेष प्रेम असणाऱ्या “स्वीगी’ आणि “झोमॅटो’ या “साईटस’ योजनेमध्ये “ऍड’ करण्यात येणार असल्याने “नियम पाळणाऱ्या पुणेकरांसाठी’ ही “पर्वणी’च असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.