शेवगाव -शेवगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी नेमलेल्या पथकाने छापा टाकून तब्बल 55 जुगाऱ्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 35 लाख 85 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेवगाव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या पथकाने कारवाई केल्याने शेवगाव पोलिसांचा निष्क्रीय कारभार समोर आला असून, अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हा जुगार अड्डा नेवासा रोडवरील स्टेट बॅंकेच्या समोर रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेतील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये सुरू होता. याबाबत माहिती की, शेवगाव शहरातील नेवासा रोडवर असलेल्या स्टेट बॅंकेच्या समोरील रोडलगत फिरोज ईनामदार यांचे मालकीचे पत्र्याचे बंद मोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची खबर विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांना समजल्यानंतर त्यांनी विशेष पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र सोनवणे, पो.ना. नितीन सकपाळ, उमाकांत खापरे, विश्वेश हजारे, चेतन पाटील, अमोल भामरे, नारायण लोहरे, सुरेश टोंगारे यांच्या पथकाने बुधवार (दि.9) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी या ठिकाणी जमिनीवर बसून काही लोक 52 पत्त्यांच्या कॅटमधील अंकावर व चित्रावर पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आले.
पथकाने छापा टाकून तब्बल 55 जुगाऱ्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार 360 रुपये रोख रक्कम, 4 लाख 39 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी, 28 लाख रुपये किंमतीच्या कार व जीप, 76 हजार 500 रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकुण 35 लाख 85 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.