पिंपरी – दगडफेक आणि कोयत्याने वार करीत टोळक्याने रहाटणी भागात शुक्रवारी (दि. 30) रात्री दहशत निर्माण केली. या गुंडांची नागरिकांमधील दहशत कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी सोमवारी (दि. 2) रहाटणी आणि काळेवाडी भागात धिंड काढली.
शुभम निवृत्ती कवठेकर (वय 23 रा. बिबवेवाडी, पुणे), दीपक नाथा मिसाळ (वय 23), मंगेश मोतीराम सकपाळ (वय 23, दोघेही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजाळी (वय 19), आकाश महादेव कांबळे (वय 22), सनी गौमत गवारे (वय 19, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींना न्यायलयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. या कोठडीचा सोमवारी अखेरचा दिवस होता.
तपासाकरिता वाकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने, वीरेंद्र चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी सहा आरोपींना ज्या ठिकाणी तोडफोड केली होती त्या ठिकाणी नेले. सर्व आरोपींना बेड्या घालून गल्ली बोळातून फिरविले. ज्या परिसरात या गुंडांनी दहशत पसरवली होती, त्याच भागात त्यांना फिरवून नागरिकांच्या मनातील गुंडांविषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. काही नागरिक घरातून तर काहीजण बिनधास्तपणे बाहेर येऊन पोलिसांनी काढलेली ही वरात पाहात होते.
नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात होते. आरोपींनी कुठे कुठे तोडफोड केली याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयतेही हस्तगत केले आहेत.
– वीरेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक