अनपेक्षित निकालांबाबत पुणेकरांकडून आश्‍चर्याचीही भावना

नेमके कोण जिंकणार? याबाबत चौकाचौकांत अनेक उलटसुलट चर्चा


निवडणूक निकाल पाहण्यासाठी टीव्ही स्क्रीनची व्यवस्था

पुणे – एरव्ही शहरातील रस्त्यांवर ओसंडून वाहणारी वाहनांची गर्दी गुरुवारी तुरळक होती. अनेक ठिकाणी लोक मोबाइल, टीव्ही स्क्रीनवर निवडणुकांचे निकाल ऐकत होते. तर, काहीजण आपल्या आप्तेष्टांना फोनवरून निकालासंबंधीची माहिती विचारत होते. नागरिकांना निवडणूक निकाल पाहता यावेत, यासाठी शहरात काही ठिकाणी टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकांच्या निकालांबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आणि आनंद दिसत होता.

गेले दोन महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली आणि त्यानंतर निकालाचे वेध लागले होते. अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेला निकाल अखेर गुरूवारी जाहीर झाला. मात्र, निकालाच्या दिवशी अनेक नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नेमके कोण जिंकणार? याबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत होत्या. त्यामुळे निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल हे जाणून घेण्याबाबत अनेकांमध्ये कुतुहल होते. जसजसे निकालाचे अंदाज समोर येत होते, तसतसे नागरिकांकडून आनंदी आणि आश्‍चर्यकारक अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. विशेषत: सोशल मीडियावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली. यामध्ये नागरिकांकडून निकालाचे स्वागत तर केले जात होतेच, शिवाय अनपेक्षित निकालांबाबत आश्‍चर्यही व्यक्‍त केले जात होते.

अतिशय शांततापूर्वक आणि उत्साही वातावरणात नागरिकांनी निवडणूक निकालाचे स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.