नवी दिल्ली : आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येत असतात ज्यामुळे काहींचे आयुष्यच संपुर्णपणे बदलून जाते. त्यातही जर घराचा आधारस्तंभ असणारी व्यक्ती जर सोडून गेली तर त्या घरातील सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र, यातून सावरून आपल्या कुटूंबियांना जगण्याची नवी आशा दाखवण्याची जिद्द काही मोजक्याच लोकांकडे असते.
अशाच जिद्दीच्या जोरावर एका दिवंगत आर्मी ऑफिसरच्या पत्नीने देशसेवा करण्यासाठी आपल्या अडणचींवर मात केली. त्यामुळेच आज त्या भारतीय हवाई दलातील एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याच या जिद्दीची कहाणी…
जम्मूची रहिवासी असलेल्या राधा चडक नुकतीच एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर झाली. पतीच्या निधनानंतर सर्व अडचणींचा सामना करून त्यांनी हे स्थान मिळवले आहे. जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील स्मेलपूर गावात 8 ऑगस्ट 1992 रोजी जन्मलेल्या राधा लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. मुळातच घरात लष्कराचे वातावरण होते. त्यांनी आर्मी स्कूलमधून 12 वी पूर्ण केल्यानंतर राधा यांनी जम्मू विद्यापीठात कायद्यासाठी प्रवेश घेतला. 2015 मध्ये त्यांचे वायुसेनेत कार्यरत असणाऱ्या कमिशनर ऑफिसर सीपीएल बूटासिंग मनहासशी लग्न झाले.
लग्नानंतर 2016 मध्ये राधाने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जम्मू उच्च न्यायालयात वकील म्हणून सराव करण्यास सुरवात केली. दरम्यान, 2017 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. घरी सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण 21 जून 2018, या तारखेने राधा यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. राधा यांचे पती अंदमान येथे असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.
राधा यांच्यावर अचानकपणे दु:खांचा डोंगर कोसळला. 21 जून रोजी राधा यांच्या पतीचे निधन झाले आणि 24 जून रोजी राधा जम्मू-काश्मीर पोलिसात सब इन्स्पेक्टर पदासाठी परिक्षा घेणार होती. या कठीण काळात राधा परीक्षा देण्यास गेल्या मात्र त्या परिक्षा न देताच घरी परतल्या.
आतून खचून गेलेल्या राधाने मनात एक गोष्ट पक्की केली होती ती म्हणजे, आपल्या पतीने सोडलेला निळा रंगाचा गणवेश अंगावर चढवायचा. त्यासाठी अनेक कठिण प्रसंगातून त्या गेल्या. याविषयी त्या म्हणतात, मी ठरवलं होत की, भारतीय हवाई दलात निळ्या रंगाच्या गणवेशासोबत देशाची सेवा करेन. मात्र माझे कायदेविषयक शिक्षण झाल्याने मी त्यासाठी पात्र नसल्याचे मला समजले. पण या यानंतरही राधाचा आत्मविश्वास कमी झाला नाही.
यानंतर त्यांनी ती एएफसीएटी म्हणजेच एअरफोर्स कॉमन एन्ट्रन्स टेस्टसाठी अर्ज केला. यानंतर ती 2 सप्टेंबर रोजी कोचिंगसाठी दिल्लीला गेली. 16 सप्टेंबर रोजी त्याची परीक्षा होती. पहिली संधी तिथे होती, तयारीही कमी होती. राधा स्क्रीनिंगमधून बाहेर पडल्या. पण त्यांनी हार मानली नाही.
डिसेंबर 2018 मध्ये पुन्हा चाचणी केली आणि यावेळी त्या कॉन्फ्रेसमधून बाहेर पडल्या. या अपयशाने खचून जाता पुन्हा एकदा नव्या जिद्दीने त्यांनी आपला नित्यक्रम चालु ठेवत शारिरीक चाचणीसाठी स्वत:ला फीट केले.
एक वर्षानंतर म्हणजेच 4 डिसेंबर 2019 रोजी ती तारीख शेवटी आली होती, राधा यांची एसएसबीसाठी निवड झाली होती आणि 4 जानेवारी 2020 रोजी हैदराबादच्या हवाई दलाच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी पोहोचल्या. त्यांचे प्रशिक्षण यावर्षी 18 डिसेंबर रोजी पूर्ण झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर कमिशन घेऊन त्या एक फ्लाइंग ऑफिसर बनल्या.
राधा यांची पहिली पोस्टिंग चंदीगडमध्ये झाली होती जिथे ती काही दिवसांत सामील होणार आहे. राधा सांगतात, आयुष्यातील कठिण परिस्थितीत इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. या प्रवासात त्यांच्या वडिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी राधा मनोधैर्य दिले नाही तर त्यांच्या मुलाची काळजीही घेतली. यासह ग्रुप कॅप्टन कमल सिंग यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असाच त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.