पुणे – आगामी महापालिका निवडणुकांसाठी “दोन सदस्यांचा एक प्रभाग पद्धत आणावी’ अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. पुणे, नागपूर आणि नाशिक या तीन महापालिकांसाठी हीच पद्धत राबवावी, असे पुण्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आणि नगरसेवकांनी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचविले आहे.
शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि दोन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करावी, अशी मागणी केली. पुणे, नागपूर, नाशिकमधील काही नगरसेवकांनीही अशा रचनेची मागणी केलेली आहे. निवडणुकांना अजून सव्वा वर्ष बाकी असल्याने त्यावर विचार होऊ शकतो, असे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते. दोन सदस्यांचा प्रभाग अशी रचना आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना सुचविली असल्याचे माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेची 2017 सालची निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग या रचनेत झाली होती. त्यावर्षी केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत होते, त्याचा फायदा उठवून विस्कळीत असलेल्या विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असा प्रयत्न भाजपने केला. त्यात त्यांना यश आले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच चार सदस्य पद्धत रद्द करण्यात आली.
दरम्यान, एक सदस्यीस-वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आहे; परंतु आघाडीतील पक्षांनी पुणे, नागपूर, नाशिक येथे दोन सदस्यांचा एक प्रभाग यावर जोर दिलेला आहे. एक सदस्य वॉर्ड पद्धतीत सलग आरक्षण आल्यास काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यांना निवडणूक लढवता येत नाही. यावर तोडगा म्हणून दोन सदस्यांचा एक प्रभाग ही रचना अंमलात आणावी, अशी मागणी आहे.
तसेच, शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते सामान्य घरातले आहेत. त्यांना चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीत निवडणूक लढवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे ही पद्धत रद्द झाली हे शिवसेनेच्या दृष्टीने सोयीचे झालेले आहे. दोन सदस्यांची प्रभाग पद्धत ही शिवसेनेची राजकीय गरज झालेली आहे. पुणे महापालिकेत सध्या शिवसेनेचे दहा सभासद आहेत. दोन सदस्यांचा एक प्रभाग अशा पद्धतीने निवडणूक लढवल्यास पक्षाचे ते संख्याबळ सध्याच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट वाढू शकते असा आशावाद सेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.