केडगावात तुंबळ हाणामारी, दगडफेक

पोलीसांकडून 14 जणांवर गुन्हा; दोन गटात वाद

केडगाव- केडगाव (ता. दौंड) येथे किरकोळ वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक झाली. पोलिसांच्या तत्परतेने केडगाव परिसराती स्थिती पूर्वपदावर आली आहे. वातावरणात मात्र अद्यापही तणाव असुन या प्रकरणी 14 जणांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव येथील व्यापारी सुनील निंबाळकर हे रविवारी (दि.17) दुपारी स्वतःच्या दुकानाकडे जात असताना बाजारपेठेत दुचाकीवर बसलेल्या काही तरुणांनी शिवीगाळ व मारहाण केली. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करीत हे प्रकरण मिटवले, त्या ठिकाणी झालेल्या झटापटीत निंबाळकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली होती, त्या घटनेचा आज (दि. 18) व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदवला.

पोलीस स्थानकासमोर निषेध सभा सुरू असताना पोलीस काही तरुणांना घेऊन आले असता हेच आरोपी, असे समजून जमावातील काही जणांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे प्रकरण जास्त चिघळले. मारहाण झालेल्या तरुणांचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि दोन गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. पोलीसबळ अपुरे असल्याने जमाव पांगवणे अवघड झाले होते. सदर स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि यवतचे भाऊसाहेब पाटील यांनी तत्परता दाखवून वातावरण निवळण्यास सहकार्य केले.

केडगावची स्थिती पूर्वपदावर आली असुन गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे. व्यापारी व दोन्ही गटातील नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीसांनी केले असुन अफवावर विश्वास ठेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.