प्रभात वृत्तसेवा,पुणे, दि. 29 -नगर रस्त्यावर सुमो गाडीमध्ये झोपलेल्या चालकाला दमदाटी करून त्याची गाडी चोरली. त्यानंतर त्याच गाडीतून पळून जाताना वानवडी येथे एका पादचाऱ्याला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने सापळा रचून अटक केली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची चार वाहने जप्त केली. त्यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत सात गुन्हे आहेत.
रोहित रामप्रताप वर्मा (रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्मा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. संशयित आरोपी वर्मा आणि त्याच्या साथीदाराला हडपसर येथून एका दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. साळुंखे विहार रोडवर दुचाकी चालकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन मारहाण करीत त्याची दुचाकी या दोघांनी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.
या दोघांनी चार दिवसांपूर्वी पहाटे साडेचार वाजता नगर रस्त्यावरून सुमो गाडी चोरल्याचे कबूल केले. गाडीत झोपलेल्या चालकाला दमदाटी करून गाडी पळून नेली. त्यानंतर ही गाडी घेऊन पळून नेताना वानवडीतील गणेशनगर भागात एका पादचाऱ्यांच्या अंगावर गाडी गेली. अपघातात पादचाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला. यानंतर वर्मा आणि त्याचा साथीदार दोघेही पसार झाले होते.