कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांबवडे बाजारपेठेमध्ये घडली आहे. अज्ञात शिवभक्तांनी काल मध्यरात्री शिवरायांचा अर्धाकृती पुतळा गावाच्या मुख्य चौकात बसवल्याच्या घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मात्र कोणतीही पूर्व कल्पना न देता पुतळा बसवल्याने तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय शिवभक्त सुद्धा पुतळा न हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
शिवरायांचा पुतळा बसवण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे बांबवडेसह परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून बांबवडे बाजारपेठेला ओळखले जाते. या बाजारपेठेतील कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावरील मुख्य चौकात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अचानक वसवण्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
दरम्यान, हा पुतळा कोणतीही परवानगी न घेता बसवल्यामुळे परिसराला शिवभक्तांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी देखील मोठी गर्दी केली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी आणि इतर शिवभक्त पुतळा हटवण्याच्या मागणी वरती या ठिकाणी ठिय्या मारून बसले आहेत.
यावेळी जिल्हा प्रशासनाने शिवभक्तांना परवानगी घेऊन पुतळा बसवावा अशी विनंती केली. मात्र शिवभक्त कोणत्याही परिस्थितीत पुतळा न हटवण्याचा भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे तानावामध्ये अधिकच भर पडली आहे.