तुम्हीच सांगा, जम्बो हॉस्पिटलमध्ये तब्बल 800 बेड्स, परंतु उपयोग काय?

अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी आईला घेऊन आलेल्या उद्विग्न मुलाचा सवाल

पुणे – ऑक्सिजनबेड, व्हेन्टिलेटर वगैरे व्यवस्था असलेल्या जंबो कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन थाटामाटात केले खरे; परंतु तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाच नसल्याने एका मुलाला 84 वर्षे वयाच्या आईला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलचे उंबरे झिजवत फिरावे लागले. अखेर ससूनमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यानंतर तेथे त्यांना दाखल करून घेतले. अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनकच आहे.

800 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटलचे वाजतगाजत मागील रविवारी उद्घाटन करण्यात आले. मंगळवारपासून करोनाग्रस्त रुग्णांना उपचारार्थ दाखल करून घेतले जाईल, अशी घोषणाही पालकमंत्री अजित पवार यांनी केली. बुधवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून जाहीरही केले. मात्र, याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था ना व्हेन्टिलेटरची अशी परिस्थिती आहे. एवढेच नव्हे, तर येथील रुग्णाला पाणीही उपलब्ध केले गेले नाही, अशी परिस्थिती आहे.

करोनाचा संसर्ग झाल्याने संजय सोनावणे यांच्या वय वर्षे 84 असलेल्या आईला दळवी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, शुक्रवारी रात्री अचानकच त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी पुन्हा दळवी हॉस्पिटल गाठले. मात्र, तेथे जागाच शिल्लक नसल्याने त्यांना अन्य रुग्णालयांमध्ये जागा आहेत का पहा असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी नुकतेच सुरू झाल्याची घोषणा केलेल्या सीओईपी ग्राऊंडवरील जंबो हॉस्पिटलमध्ये आईला नेले. तर तेथे ऑक्सिजन कीटच अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्याची सोय येथे नाही. केवळ सौम्य लक्षणे असलेल्यांना केअर म्हणून येथे ठेवू शकता असे सांगण्यात आले.

त्यानंतर सोनावणे यांनी आईला नायडू रुग्णालयात नेले मात्र तेथेही ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी जहांगीरला हलवण्याचा निर्णय घेतला. तेथेही बेड उपलब्ध नसल्याने त्यांचा धीरच खचला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी दोन-तीन तासांनी ससून रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली आणि तेथे रुग्णाला दाखल करण्यात आले.

मात्र या सगळ्या प्रक्रियेत बरेच तास गेले होते. आताही त्या वृद्धेची प्रकृती चिंताजनकच आहे. डॅशबोर्डवर जागा उपलब्ध आहेत वगैरे माहिती देऊनही प्रत्यक्षात रुग्णांना उपचारापासून अशाप्रकारे वंचित रहावे लागत असल्याचा हा प्रकार समोर आला आहे. याबाबत आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी संपर्क केला असता, तो “आपण डायल केलेला क्रमांक अन्य नंबरवर फॉरवर्ड केला आहे’ असा मेसेज येऊन कॉल डिस्कनेक्ट झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.