स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट

सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांचा भाजप-शिवसेनेला जाहीर पाठिंबा

राजू शेट्टी यांना एकट पडण्याचा डाव

कोल्हापूर – लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना आणि प्रत्यक्ष मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी भाजप-शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. देशमुख हे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्‍यातील कोकरूड गावचे रहिवाशी असून 2009पासून ते स्वाभिमानीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आंदोलनात राजू शेट्टी सोबत देशमुखांनी काम केले आहे.

विकास देशमुख म्हणाले, शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राजू शेट्टी जाऊन बसले आणि त्यांच्यासोबत महाघाडीत सामील झाले म्हणून भाजप-शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हेही उपस्थित होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास देशमुख यांनी पक्ष सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला याचा फटका बसणार आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर थेट टीका केली, तर पाशा पटेल यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता “डोळे असून पण आंधळेपणाचे नाटक करणाऱ्या नेत्यांना मी पाहिले’, अशी खरमरीत टीका केली.

विकास देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडली असून राजू शेट्टी यांना एकटं पाडण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.