जम्मू – जम्मू शहराच्या बाहेरील नरवाल भागात झालेल्या दोन स्फोटांच्या तपासासाठी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक नरवालमध्ये दाखल झाले आहे. शनिवारी झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत.
ट्रान्सपोर्ट नगर परिसरात उभ्या असलेल्या एसयूव्हीमध्ये आणि जवळच्या भंगार माल ठेवण्याच्या ठिकाणी एका वाहनामध्ये दुहेरी स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. त्यासाठी सुधारित स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
कॉंग्रेसची सध्या चालू असलेली भारत जोडो यात्रा आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी या प्रदेशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असतानाच हे स्फोट झाले आहेत. हा सुरक्षा दलांना थेट आव्हान देण्याचाच प्रकार नाही ना अशीही शंका घेतली जात आहे.
शोधपथकाने घटनास्थळाचे काही नमूने तपासासाठी घेतले आहेत. हा परिसर अजूनही सुरक्षिततेच्या कक्षेत आहे. राजौरी या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हादरले होते ज्यात सात जण ठार आणि 14 जखमी झाले होते. या हल्ल्यामागील संशयित दहशतवादी अजूनही फरार आहेत.