कानपूर – सलामीवीर शुभमन गिल, पदार्पणवीर श्रेयस अय्यर व अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात गुरुवारी 4 बाद 258 धावा करत आश्वासक सुरुवात केली. अंधुक प्रकाशामुळे 6 षटके खेळ आधी थांबवण्यात आला त्यावेळी अय्यर 75 तर, जडेजा 50 धावांवर नाबाद आहेत.त्यापूर्वी गिल 52 धावांची खेळी करून बाद झाला.
भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करन्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयंक आग्रवाल 13 धावांवर बाद झाला. त्यावेळी संघाच्या 21 धावा झाल्या होत्या. त्यानंतर गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीत डाव सावरला. गिल बाद झाल्यानंतर पुजाराच्या साथीत कर्णधार रहाणेने संघाचे शतक फलकावर लावले.
श्रेयस @ 303
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू झाला आहे. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरसाठी हा सामना खास ठरला. या सामन्याद्वारे त्याने कसोटी पदार्पण केले. त्यानेही पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात दमदार अर्धशतकी खेळी केली व आपली निवड सार्थ ठरवली. त्याला भारताचे माजी कर्णधार आणि विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी डेब्यू कॅप दिली. श्रेयस हा भारताचा 303 वा कसोटीपटू आहे. त्यामुळे त्याच्या कॅपवर 303 हेच क्रमांक लावले गेले.
हे दोघे बाद झाल्यावर संघाचा डाव अडचणीत आला होता. मात्र, अय्यरने पदार्पण साजरे करताना जडेजासह भक्कम भागीदारी करत संघाला अडीचशे धावांची मजल मारुन दिली. या दोघांनी अर्धशतके फटकावताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज काएल जेमिसनने 3 गडी बाद केले. टीम साऊदीने 1 बळी घेतला.
अय्यर-जडेजा हीट
या कसोटीत पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरने नाबाद 75 धावांची खेळी करताना रवींद्र जडेजाच्या साथीत पाचव्या गड्यासाठी 113 धावांची अखंडीत भागीदारी केली. अय्यरने आपल्या खेळीत 136 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. जडेजानेही अर्धशतकी पल्ला पार करत नाबाद 50 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 100 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार फटकावले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 17 वे अर्धशतक ठरले.
गिलने दाखवली जिगर
सलामीवीर शुभमन गिल याने आग्रवाल बाद झाल्यावरही न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना जिगरबाज अर्धशतकी खेळी केली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक ठरले. त्याने 81 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली.
रहाणे-पुजाराने विकेट गमावली
ऑस्ट्रेलियातील यशस्वी कामगिरीनंतर सातत्याने अपयशी ठरलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीने या सामन्यात मात्र, आश्वासक सुरुवात केली होती. हे दोघेही स्थिरावल्यावर बाद झाले. रहाणेने 63 चेंडूत 6 चौकार फटकावत 35 धावांची खेळी केली. पुजाराने 88 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह 26 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 84 षटकांत 4 बाद 258 धावा. (शुभमन गिल 52, अजिंक्य रहाणे 35, चेतेश्वर पुजारा 26, मयंक आग्रवाल 13, श्रेयस अय्यर खेळत आहे 75, रवींद्र जडेजा खेळत आहे 50, काएल जेमिसन 3-47, टीम साउदी 1-43).