पुणे, – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वेळेत पदवी पूर्ण करू न शकलेले विद्यार्थी उपोषणाला बसले होते. एखादा अभ्यासक्रम ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, काही कारणास्तव विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड घ्यावा लागला. अंतिम वर्षात शिकत असताना विद्यापीठाने त्यांचे पीआरएन (परमनंट रजिस्ट्रेशन नंबर) ब्लाॅक केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज करता येत नव्हते. त्यावर उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ठोस आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.
विद्यापीठाच्या अधिसभेपूर्वी मुख्य इमारतीच्या समोर विद्यार्थ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले होते. विद्यार्थ्यांनी आमचे पीएनआर अनब्लाॅक करण्याची आग्रहाची मागणी केली. परंतु, आता अधिसभा होणार आहे. त्यात हा विषय येऊ नये, त्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी रात्री उशिरा विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांना कुलसचिवांचे लेखी पत्र दिले. तुमची मागणी कायद्याच्या चौकटीत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
त्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर विद्यापीठात असलेल्या विद्यार्थ्यांचे मागण्यांचा विचार करावा. त्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासाने संबंधित विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.
अधिसभेत विद्यार्थ्यांचा विषयाकडे दुर्लक्ष…
दोन दिवस विद्यापीठाची अधिसभेत वादळी चर्चा झाली. अधिसभेत पीआरएन ब्लाॅक केल्याच्या कारणावरुन थंडीच्या कडाक्यात दोन दिवस उपोषण केलेल्या विद्यार्थ्यांचे विषय एकाही अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे. एवढेच नव्हे, तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आश्वासन दिले असली तरी त्याची मागणी पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.