डुमका- झारखंडच्या डुमका येथे रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ झालेल्या चकमकीत एक जवान शहिद, तर चार जवान जखमी झाले आहेत. निरज छत्री असे शहिद झालेल्या जवानाचे नाव आहे. शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.
शोधमोहीम सुरू असतानाच लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्यांना जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पण दुर्दैवाने एक जवान देखील शहीद झाला आणि अन्य चार जवान जखमी झाले आहेत. राजेशकुमार राय, सोनुकुमार, सतिश गुजर आणि करणकुमार अशी गंभीर जखमी झालेल्या जवांनाची नावे आहेत.
एका गंभीर जखमी झालेल्या जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर अन्य जखमी जवानांवर डुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, परिसरात शोधमोहीम अद्यापही सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिली.