दुसाळे येथील जवानाला लेहमध्ये वीरमरण

सातारा -पाटण तालुक्‍यातील दुसाळे येथील जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) यांना लेहमध्ये देशसेवा बजावताना बुधवारी (दि. 16) दुपारी वीरमरण आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील यांनी दिली. सचिन जाधव हे 111 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या भारत-चीन सैन्यात लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. तेथे कर्तव्यावर असलेले जाधव यांना वीरमरण आल्याने दुसाळे गावासह पाटण तालुक्‍यावर शोककळा
पसरली आहे.

सचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण मिलिटरी अपशिंगे येथील शाळेत झाले होते. त्या काळात त्यांचे वास्तव्य त्यांच्या मावशीकडे होते. त्यांनी पदवीचे शिक्षण साताऱ्यातील शिवाजी कॉलेजमधून घेतले होते. लष्करी सेवेत जाण्याची जबरदस्त ओढ त्यांना होती. ते 2005 मध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये दाखल झाले होते. ते नाईक पदावर होते. भारत-चीन सीमेवर लेह येथील निमो या दुर्गम सेक्‍टरमध्ये ते सेवा बजावत होते.

हा भाग समुद्रसपाटीपासून तब्बल दहा हजार तीनशे फूट उंचीवर लेह जिल्ह्यातील लिकिर तालुक्‍यात आहे. तेथे बुधवारी त्यांना वीरमरण आले, असे पुणे येथील दक्षिण कमांड मुख्यालयाला व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना कळवण्यात आले.

सचिन यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. वडील संभाजी जाधव हे निवृत्त लष्करी जवान असून सचिन यांचे धाकटे बंधू किरण जाधव (वय 33) हेसुद्धा लष्करात सिकंदराबाद येथे सेवा बजावत आहेत. सचिन यांच्या वीरमरणाचे वृत्त किरण यांनीच शुक्रवारी सकाळी दुसाळे येथे घरी कळविले. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले.

सचिन जाधव यांचे पार्थिव पुणे येथील लोहगाव विमानतळावरून येणार असून तेथून ते उद्या, दि. 19 रोजी पहाटे 4 वाजता दुसाळे येथे आणले जाणार आहे. सचिन यांच्या पश्‍चात पत्नी प्रेमला, एक मुलगा, एक मुलगी, वडील, आई, विवाहित बहीण, बंधू असा परिवार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.