वडगाव मावळ – मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत 370 मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूणच मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 21) शांततेत मतदान प्रक्रिया झाली. सुमारे 71.27 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली.
2014 च्या निवडणुकीत पुरुष 1 लाख 49 हजार 503, स्त्री 1 लाख 36 हजार 205 व अन्य 1 असे एकूण 2 लाख 85 हजार 709 मतदान होते. त्यापैकी पुरुष 1 लाख 10 हजार 574 व स्त्री मतदार 93 हजार 199 असे एकूण 2 लाख 3 हजार 773 मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीत पुरुष मतदार 1 लाख 80 हजार 202, स्त्री मतदार 1 लाख 68 हजार 256 व अन्य 4 असे एकूण 3 लाख 48 हजार 462 मतदान आहे. त्यापैकी 1 लाख 31 हजार 806 पुरुष मतदार, तर 1 लाख 16 हजार 542 व अन्य 1 असे 71.27 टक्के मतदान झाले असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रविवारी (दि. 20) पावसाला सुरू झाली होती. दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. सोमवारी (दि. 21) दिवसभर पावसाने उघडीप दिली. सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान पुरुष 16 हजार 170 व स्त्री 7 हजार 302 एकूण 23 हजार 472 मतदान असे 6.74 टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे अंदाजाने मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबचलांब रांगा लावल्या. दर दोन तासांनी सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान पुरुष 40 हजार 591 व स्त्री 25 हजार 39 एकूण 65 हजार 631 मतदान असे 18.83 टक्के, तर सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान पुरुष 69 हजार 71 व स्त्री 54 हजार 285 एकूण 1 लाख 23 हजार 357 मतदान 35.04 टक्के, दुपारी 1 ते दुपारी 3 च्या दरम्यान पुरुष 94 हजार 1 व स्त्री 82 हजार 764 एकूण 1 लाख 76 हजार 766 मतदान 50.73 टक्के मतदान झाले.
दुपारी 3 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान पुरूष 1 लाख 17 हजार 945 व स्त्री 1 लाख 6 हजार 315 एकूण 2 लाख 24 हजार 261 मतदान 64.36 टक्के मतदान झाले. या मतदान प्रसंगी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय यांच्या वतीने तसेच सीआयएसएफ, एसआरपीएफ, कर्नाटक होमगार्ड यांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत झाली.
काही ठिकाणी मतदान केंद्र सजविण्यात आले होते, तर मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच मतदान केल्यावर मतदारांना “सेल्फी पॉईंट’ची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी मदतनीस, व्हीलचेअर व वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.